
कर्नाटक पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली मुख्यमंत्र्यांची क्लास !
दै. बातमीदार । २९ मे २०२३ । देशातील कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून भाजप कामाला लागली असून आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा रविवारी क्लास घेतला असून, कर्नाटकच्या पराभवातून धडा घेण्यास सांगितले आहे. या मुख्यमंत्र्यांना त्यांनी २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत १०० टक्के जागा जिंकण्याचे लक्ष्य दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप मुख्यालयात भाजपशासित राज्यांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजपशासित राज्यांना १०० टक्के लोकसभा जागा जिंकण्याचे लक्ष्य मुख्यमंत्र्यांना दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी मुख्यमंत्र्यांना कर्नाटकच्या पराभवातून धडा घेण्यास सांगितले. तेथे अँटी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा दारूण पराभव झाला होता.
या सर्व राज्यांतील भाजपच्या संघटन स्थितीवरही चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना तळागाळात जाऊन सर्वसामान्य लोकांना भेटण्यास व त्यांचे सुख-दु:खात सहभागी होण्यास सांगितले आहे. त्यांच्यापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना घेऊन जाण्यासही सांगितले आहे. याबरोबर सर्व भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ३० मेपासून सुरू होणाऱ्या भाजपच्या देशव्यापी जनसंपर्क अभियानाचे लक्ष्य दिले आहे. आपापल्या राज्यांत प्रमुख प्रसिद्ध खेळाडू, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक कार्यकर्त्यांना नावे विचारून त्यांच्याशी जनसंपर्क करण्यास सांगितले आहे. रविवारी दुपारी ३ वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी उशीरापर्यंत चालली. या बैठकीत सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम