रविकांत तुपकरांचा राजकीय एल्गार ; रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या साक्षीने दाखल केला अर्ज

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ एप्रिल २०२४ । जाहीर सभेतील आक्रमक अन् भावनिक भाषणे, हलगी, बैलबंडीसह स्वखर्चाने घरची चटणी-भाकर खावून बुलडाण्यात हजारोंच्या संख्येत दाखल झालेली जनता…या रेकॉर्डब्रेक जनतेच्या साक्षीने रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचे नामांकन म्हणजे स्वबळावर केलेले शक्तिप्रदर्शन ठरले! रविकांत तुपकरांनी २२ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच राजकीय एल्गार पुकारलाय…

स्थानिय जिजामाता व्यापार संकुल नजीकच्या मैदानात तुपकरांची जाहीर सभा पार पडली. यावेळी तुपकरांनी धुवांधार भाषण करीत उपस्थित कार्यकर्त्यांत जोश भरला. आपल्या भाषणातून त्यांनी केवळ आणि केवळ खासदार जाधव यांनाच लक्ष्य करीत बुलढाणा मतदारसंघातील लढत महायुतीविरुद्ध असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. यानंतर संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजारपेठ, कारंजा चौक मार्गे रॅली काढण्यात आली. यानंतर तुपकरांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला. आजच्या गर्दीने तुपकरांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेतून येत आहे. तर २२ वर्षे जनतेसाठी अविरत झटलो आज तुमच्या आशिर्वादाची गरज आहे, असे आवाहन तुपकरांनी केले.

आजच्या निर्धार सभेत रविकांत तुपकरांची दोन रूपे पाहायला मिळाली. हजारोंच्या संख्येने उपस्थित शेतकरी, युवक, माता भगिनी यांच्या बद्दल बोलतांना ते अतिशय भावनिक भाषेत बोलले. मात्र खासदार जाधव यांच्यावर बोलताना ते रोखठोक, आक्रमक बोलले. या दोन्ही भाषेतील मनोगताला उपस्थितानी भरभरून टाळ्या देत दाद दिली.

भाषणाची सुरुवात करतांना तुपकर म्हणाले की, मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो तुमचं दर्शन घेतो या रेकॉर्डब्रेक गर्दीने मला लढायला बळ दिले आहे. मला जिल्ह्यातल्या व महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगायचं की ही भाड्याने आणलेली माणसे नाहीत, ही स्वतःच्या खर्चाने पदरमोड करून इथे सभेला आली आहे. २२ वर्षाच्या संघर्षात, तुमचे उपकार जीवात जीव असेपर्यंत विसरू शकणार नाही.अर्ज भरायला येऊ नये म्हणून विरोधकांनी दबाव टाकला पण जनता दबावाला भिक घालत नाही. आजही तुम्ही त्यांच्या दबावाला भीक घातली नाही, माझी ताकत, इस्टेट, बळ, सर्वस्व तुम्ही आहात.

एक ना एक दिवस राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद संपणार आहे, असे सांगून त्यांनी जाधवांचा परखड भाषेत समाचार घेतला. मागील १५ वर्षात त्यांनी काय विकास केला याचे उत्तर त्यांच्याकडेही नाही, जिल्हा भकास करून टाकला हीच त्यांची उपलब्धी आहे. मेहकर वाल्यांनी अफवा पसरवल्या की, मी अर्ज माघार घेणार म्हणून. मेहकर मध्ये त्यानी अफवांचे पोते भरून ठेवले आहे, मेहकरवाले मुद्दाम करतात. त्यांना यावेळी जनता, शेतकरी पराभवाची धूळ चारणार ही काळ्या दगडावरची रेष आहे असे तुपकर म्हणाले.

 

तुपकरांची दत्तक कन्या वैष्णवीच्या भाषणाने आणले उपस्थितांच्या डोळ्यात पाणी

माझे नाव वैष्णवी भारंबे-तुपकर आहे, कारण मी ७ वर्षाची असतांना माझ्या आई-वडिलांचा अपघातात मृत्यू झाला, त्यावेळी माझे २ भावंडे व मी अतिशय लहान होते, आम्हाला कोणाचा आधार नव्हता पण त्यावेळी माझ्या रविकांत बाबांनी आम्हाला आधार दिला. आमचा सांभाळ केला मला व माझ्या भावंडांना चांगले शिक्षण दिले, त्यामुळेच मी राज्यातील दोन नंबरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. रविकांतबाबांमुळेच आम्ही आज चांगले शिक्षण घेत आहोत. वैष्णवीच्या भाषणावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी होते.

बायकोचे मंगळसूत्र विकून मोताळा तालुक्यातील गोपाल सिप्पलकर यांनी दिला तुपकरांनी निवडणूकीसाठी निधी

मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथील गोपाल सिप्पलकर यांनी रविकांत तुपकरांना स्वतःच्या बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून निधी दिला आहे. सिप्पलकरांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्या कृतीमुळे तुपकरांच्या डोळ्यात अश्रू होते, त्यांनी ते पैसे वापस केले पण त्या नवरा बायकोने शपथ घातल्यामुळे तुपकरांनी त्यांच्या भावनांचा आदर केला. सिप्पलकरांच्या भावनांपुढे व्यक्त होण्यासाठी शब्द नाहीत, जनतेच्या प्रेमाचे उपकार कुठे फेडू, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम