सहजयोग ध्यान मंदिरात पहिला विश्व ध्यान दिवस साजरा
पारोळा – जगभरातील शास्त्रज्ञांना सामूहिक ध्यान साधनेचे फायदे त्यांनी केलेल्या संशोधनात लक्षात आले या ध्यानाने व्यसनं सुटतात, माणसांमध्ये आमुलाग्र परिवर्तन घडून येते, कल्पकता वाढते, स्वभाव बदलतात, माणसांमधील सर्व प्रकारचे विकार नष्ट होतात असे अनेक फायदे होतात.
संयुक्त राष्ट्र संघाने सामूहिक ध्यानधारणेचे फायदे लक्षात आल्यावर दिनांक २१ डिसेंबर रोजी विश्व ध्यान दिवस साजरा करण्याचे ठरवले.
परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग ध्यान मंदिर, डीडी नगर, पारोळा येथे विश्व ध्यान दिनाच्या निमित्ताने ध्यान धारणेच्या विषयीचे विस्तृत प्रदर्शन लावण्यात आले होते.
गावातील नागरिकांनी दिवसभर येथे भेट देऊन सहजयोग ध्यान धारणे विषयी जाणून घेतले व आत्मसाक्षात्काराची अनुभूती प्राप्त केली.
सायंकाळी सहा वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी भिकेश सराफ यांनी भारतीय योगशास्त्रात वर्णित आपल्या शरीरातील इडा, पिंगला, सुषुम्ना या तीन नाड्या व मुलाधार चक्र स्वाधीष्ठान चक्र, मणिपूर चक्र,अनाहत चक्र, विशुद्धी चक्र आज्ञाचक्र, सहस्रार चक्र यांना मेडिकल सायन्स मध्ये काय म्हणतात ते सविस्तर समजून सांगितले.
या नाड्या व चक्रे आपल्या शरीरात काय कार्य करतात ते जर असंतुलित झाले तर आपल्याला काय त्रास होतो, कुठले विकार होतात व ते आपण कसे सहजयोग ध्यान पद्धतीने दुरुस्त करू शकतो याविषयी सविस्तर माहिती दिली.
सतत भूतकात रममाण होण्याने कुठले मानसिक विकार होतात, जास्त भविष्याचा विचार केल्यामुळे अति उष्णतेचे कुठले आजार जडतात व वर्तमान काळात राहिल्याने संतुलन कसे प्राप्त होते याविषयी समजावून सांगितले.
त्यानंतर सहजयोग ध्यान केंद्राचे तालुकाप्रमुख संजय चौधरी सर यांनी आलेल्या सर्व साधकांना कुंडलिनी जागृती द्वारे आत्मसाक्षात्काराची अनुभूती प्रदान केली, सगळ्यांना आपल्या टाळूतून थंड थंड चैतन्य प्रवाहित झाल्याची जाणीव झाली आणि त्यांच्याकडून अर्धा तास ध्यान करवून घेतले व हे ध्यान घरी कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पारोळा तालुक्यातील सर्व सहजयोगी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम