संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल म्हणाले…कश्मिरी पंडित !
दै. बातमीदार । २९ जानेवारी २०२३ । देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपवर आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चांगलाच हल्ला बोल केला आहे. ते म्हणाले कि, ३७० कलम हटवल्यावर जम्मू-कश्मीरमध्ये काय बदलले? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. कश्मीर खोऱ्यातील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे व बंदुकांच्या जोरावर तात्पुरती शांतता नांदते आहे, असा हल्लाबोल आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला. सामानातील आजच्या रोखठोक सदरातून जम्मू-काश्मीरमधील स्थितीवरुन राऊतांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
राऊत यांनी म्हटले आहे की, ज्या कश्मिरी पंडितांच्या हत्येचा व घरवापसीचा ‘प्रपोगंडा’ भाजपने राजकारणासाठी केला, ते कश्मिरी पंडित आजही भीतीच्याच छायेखाली जगत आहेत. मी जम्मूत उतरताच मला सांगण्यात आले, कश्मिरी पंडित मोठ्या संख्येने जम्मूत गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर बसली आहेत. आंदोलन करीत आहेत. हे सर्व सरकारी कर्मचारी आहेत व कश्मीर खोऱ्यात त्यांच्या नेमणुका आहेत. ‘टार्गेट कीलिंग’ पुन्हा सुरू झाल्याने हे सर्व कश्मिरी पंडित पुन्हा जम्मूत आले.
संजय राऊत म्हणाले, ‘अतिरेकी ओळखपत्र पाहून गोळय़ा घालतात. शाळा, सरकारी कार्यालयांत घुसून पंडितांच्या हत्या करतात. आम्हाला कसलेच संरक्षण नाही. तेव्हा आमच्या बदल्या जम्मूत करा,’ असे कश्मिरी पंडित सांगतात. सरकार त्यांचे ऐकायला तयार नाही. कश्मिरी पंडितांनी खोऱ्यात जाऊन नोकरीवर रुजू व्हावे असे सरकारचे फर्मान आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार सरकारने बंद केल्याने आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मी जम्मूत त्यांना भेटण्यासाठी गेलो. तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या जयजयकाराच्या घोषणा तेथे गरजल्या. त्या आंदोलनात निवेदन करणारे अनेक तरुण मराठी बोलत होते. तुम्ही मराठी कसे बोलता? असे मी विचारले तेव्हा ते तरुण म्हणाले, ‘ही सर्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची कृपा. त्यांनी कश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे उघडले. आमच्या मुलांना उच्च शिक्षणात राखीव जागा ठेवल्याने आम्ही मुंबई-पुण्यात येऊन शिकलो. डॉक्टर, इंजिनीयर्स झालो. बाळासाहेब आणि शिवसेनेने आमच्यासाठी जे केले ते कधीच विसरता येणार नाही!’ असे भारावलेले उद्गार त्यांनी काढले. ‘शिवसेनाने हमारे लिए दिल के दरवाजे खोले.’ असे तो शेवटी म्हणाला.संजय राऊत म्हणाले, कलम 370 हटवल्यानंतरही कश्मिरी पंडितांची घरवापसी होऊ शकलेली नाही. आजही कश्मीर एक बंदिवान नंदनवन आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत व बेरोजगारीमुळे त्यांच्यात वैफल्य आहे. 370 कलम हटवल्यावर बाहेरचे उद्योग तेथे येतील हा भ्रम खोटा ठरला. पण एका विशिष्ट प्रांताचे लोक जम्मूत आले व त्यांनी व्यापार हाती घेतला हे स्पष्ट आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम