रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न केल्यास आत्मदहन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ नोव्हेंबर २०२२ । वरवंड फाटा ते डोंगरशेवली हा रस्ता कंत्राटदाराने नुसताच खोदून ठेवला आहे. वारंवार विनंती करुन, मागणी करुन एवढेच काय तर उपोषण करुनही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष दत्तात्रय जेऊघाले यांनी टोकाचा निर्णय घेत थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. रस्त्याचे काम तत्काळ सुरु करावे व संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी जेऊघाले यांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, वरवंड फाटा ते डोंगरशेवली या रस्त्याचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्यावर वरवंड, डोंगरखंडाळा, डोंगरशेवली ही तीन मोठी गावे आहेत तसेच धोडप, पळसखेड, करवंड, उंद्री व शेलसूर येथील नागरिकांना, कर्मचाऱ्यांना, रुग्णांना तसेच विद्यार्थ्यांना दररोज या मार्गाने प्रवास कराव लागतो परंतु दोन वर्षांपासून कंत्राटदाराने हा रस्ता खोदून ठेवला असून सदर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.

वाहतुकीसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. यामुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याचे बंद पडलेले काम त्वरित सुरु करुन रस्ताकाम ठरावीक वेळेत पूर्ण करावे, या मागणीसाठी दत्तात्रय जेऊघाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी १५ ऑगस्टपासून वरवंड फाट्यावर उपोषण सुरु केले होते. या उपोषणाच्या चौथ्यादिवशी प्रशासनाने काम चालू करुन एका महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रशासनाने हे आश्वासन पाळले नाही.

उपकंत्राटदाराने सदर मार्गाचे काम पूर्णपणे बंद केले आहे. सदर कामाला तत्काळ सुरुवात करावी आणि लवकरात लवकर काम पूर्ण करावे, कंत्राटदाराचा काळ्या यादीत समावेश करुन त्याच्या वयक्तिक पॅन नंबरवर बॅन आणून कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘स्वाभिमानी’चे तालुकाध्यक्ष दत्तात्रय जेऊघाले यांनी केली असून १ ऑक्टोबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सदरचे निवेदन देताना दत्तात्रय जेऊघाले यांच्यासह वनसमितीचे अध्यक्ष संजय खारे, माजी उपसरपंच रविंद्र जेऊघाले, गोविदं चावरे, अमोल मोरे यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम