खळबळजनक : दिवाळीच्या दिवशी फटाका मार्केटला भीषण आग : १२ जण गंभीर !
बातमीदार | १३ नोव्हेबर २०२३
देशभर दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असतांना मथुरेतील गोपाळबाग या परिसरात फटाका मार्केटला भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली होती. काही वेळातच आगीने अनेक दुकाने जळून खाक झाली. या अपघातात १२ जण गंभीर भाजले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मथुरा शहरातील गोपाळबाग या ठिकाणी एका फटाक्याच्या दुकानात अचानक रॉकेट शिरलं अन् बघता-बघता २६ दुकानं पेटली. या ठिकाणी अचानक आग लागल्यामुळे तेथे फटाके खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची मोठी तारांबळ उडाली. ही आग एवढी भीषण होती, की घटनेमध्ये १२ जण होरपळले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय.या आगीने रौद्ररूप धारण केले होते त्यामुळे अग्निशमन दलाच्या तब्बल २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र फटाक्यांचं अख्ख मार्केट जळून खाक झालं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम