शाहरूखने ‘जवान’ चित्रपटासाठी घेतले इतके मानधन !
बातमीदार | ४ सप्टेंबर २०२३ | सध्या गदर २ नंतर बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटामुळे तो मोठ्या चर्चेत आला असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. ‘जवान’ या चित्रपटात पाच विविध लूकमध्ये शाहरुख पहायला मिळणार आहे. त्याचसोबत यामध्ये कलाकारांची मोठी फौज आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘जवान’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा विक्रम रचू शकतो. कारण या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग तुफान झाली आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटलीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून तब्बल 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तो बनला आहे. हा शाहरुखचा आतापर्यंतचा सर्वांग महागडा चित्रपट मानला जात आहे.
‘जवान’मधल्या भूमिकेसाठी शाहरुखने तगडं मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याने तब्बल 100 कोटी रुपये फी स्वीकारल्याचं कळतंय. याशिवाय चित्रपटाच्या नफ्याचा काही भाग किंग खानला मिळणार आहे. यामध्ये शाहरुखसोबत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. नयनताराचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असून त्यासाठी तिने 11 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय. तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे विजय सेतुपती. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटात तो खलनायकी भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी त्याने 21 कोटी रुपये फी आकारली आहे.
शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याशिवाय चित्रपटात दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोवर यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटात दीपिकाची भूमिका लहान असली तरी त्यासाठी तिने 25 ते 30 कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय. ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये शाहरुखसोबत ‘वन टू थ्री फो’ गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री प्रियामणी हिने दोन कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. याशिवाय ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राला एक ते दोन कोटी रुपये मानधन मिळालं आहे. शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे ‘जवान’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अटलीने हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम