शरद पवारांचे मोदींवर टीकास्त्र !
दै. बातमीदार । २१ मे २०२३ । राज्यातील महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आज अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित होते. या वेळी कष्टकरी हमाल मापाडी कामगारांचे लोकनेते स्व. शंकरराव घुले यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना शरद पवारांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले.
आज देशात काही शक्ती अशा आहेत, ज्या समाजाला 50 वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जाती-जातींमध्ये, वेगवेगळ्या धर्मीयांमध्ये संघर्ष कसा होईल, याची खबरदारी घेतली जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
शरद पवार म्हणाले, आज देशातील चित्र बदलताना दिसत आहे. सर्वसामान्यांना जाती-धर्माच्या नावाने पेटवण्याचे काम सुरू आहे. जाती-धर्मात संघर्ष निर्माण केला जात आहे. ज्या राजकीय पक्षाकडे देशाची सत्ता आहे, त्या पक्षाकडून जाती-धर्माच्या नावावर तेढ निर्माण केला जात आहे. सत्तेचा उपयोग कष्टकरी, लहान घटकांसाठी वापरायचे सोडून समाजात दुही निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे.
शरद पवार म्हणाले, अहमदनगर जिल्हा हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या दोन, तीन दिवसांपासून शेवगावला तणाव आहे. शहरातील बाजारपेठ 3 दिवस बंद आहे. काही शक्तींकडून जातीजातीत अंतर वाढवले जात आहे. संघर्ष निर्माण केला जात आहे. अशा शक्तींशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. हा संघर्ष केला नाही तर कष्ट करणारे हमाल, कामगार यांच जिवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. भाजपवर टीका करताना शरद पवार म्हणाले, राज्य हातात घेऊन माणसामाणसांमद्ये द्वेष निर्माण करण्याचे काम या लोकांनी केले आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधिला लाखो लोक हजर होते. त्यातील 70 टक्के तरुण होते. मुख्यमंंत्री म्हणून धनगर समाजाची व्यक्ती आज त्या पदावर बसली आहे. कष्टकरी, सर्वसामान्य माणसांच्या एकजुटीमुळे हे घडू शकले आहे. जी एकजूट कर्नाटकात होऊ शकते, तशी एकजूट देशातील अन्य राज्यात का होऊ शकत नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम