शिंदे गटाने दिला राष्ट्रवादीला धक्का ; माथाडी नेता शिवसेनेत दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जून २०२३ ।  राज्यातील महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला आता शिंदे गटाने धक्का देत कुडाळ येथील आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू आणि माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी काल हा पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले, झोपडपट्टी पुनर्वसन विकास राज्यमंत्री दर्जा विजय नाहटा, वाशी नवी मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख किशोर पाटकर, घणसोली विभागातील ऋषिकांत शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ऋषिकांत शिंदे यांच्या मागे माथाडीची मोठी ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेला (शिंदे गट) मुंबई आणि सातारा जिल्ह्यात फायदा होणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे बंधूच विरोधकांना मिळाल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला काही महिने राहिले असतानाच या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे पडद्यामागची शक्ती म्हणून उभे राहिलेले ऋषिकांत शिंदे यांची सातारा जिल्ह्यातील व नवी मुंबई राष्ट्रवादी पक्षात ओळख आहे. जावळी तालुक्यात शशिकांत शिंदेंना १० वर्षांपासून आमदार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ऋषिकांत शिंदे यांनी अचानक राष्ट्रवादीला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा खांद्यावर घेत जय महाराष्ट्रचा नारा दिला. या सर्व घडामोडींमुळे शशिकांत शिंदे व राष्ट्रवादीला जोरदार धक्का मानला जात आहे. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने मुख्यमंत्री शिंदे यांनी माथाडी कामगारांमध्ये आपली ताकद वाढवली असून, त्याचा राजकीय फायदा नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानला जात आहे. राष्ट्रवादीत असणारी गद्दारी व अंतर्गत मतभेद, समन्वयाचा अभाव व गेल्यावेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत कुडाळ गटात माझा पक्षांतर्गतच कुरघोड्यांमुळे जाणीवपूर्वक केलेला पराभव. या पार्श्वभूमीवर मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे ऋषिकांत शिंदे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम