शिंदेंच्या शिवसेनेसह ठाकरे गटाला मोठा फटका : आरक्षणासाठी दिले राजीनामे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० ऑक्टोबर २०२३

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच मराठा समाजाने आता आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला असतांना या आंदोलनाची झळ शिंदेंच्या शिवसेनेसह ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. शिंदे गटाचे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच नांदेडमधून एक मोठी अपडेट समोर आली आहे. हदगावचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आपण हे पद स्विकारणार नाही. तसेच साखळी उपोषणाला आमचा पाठिंबा आहे, असं पत्रही त्यांनी शिवसेना सचिवांना दिलं आहे. शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे बीडमध्ये ठाकरे गटाला देखील मोठा धक्का बसला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या केजमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ३६ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. केजचे तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे देण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले होते.

त्यानंतर थोरात यांच्यासह इतर ३६ पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुकाप्रमुख शाखाप्रमुख आणि सर्कल प्रमुख यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवा, अन्यथा गावात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना दिला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी देखील आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेतली असून अनेक ठिकाणी राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहेत. अजित पवार गटातील काही आमदारांनी सुद्धा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम