शिवसेना आमदार प्रकरणी : न्यायालयाने नवीन तारीख दिली !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ ऑक्टोबर २०२३

राज्यातील शिंदेंच्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सुधारित वेळापत्रक सादर करण्याची शक्यता होती. पण त्यांनी ते सादर केले नाही. त्यावर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच नार्वेकरांना सुनावणीचे सुधारित वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी दिली. आता या प्रकरणी येत्या 30 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत होणाऱ्या दिरंगाईच्या मुद्यावर सुनावणी झाली. त्यात सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांना खडेबोल सुनावले. विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेल्या सुनावणीच्या वेळापत्रकावर न्यायालय समाधानी नाही. सॉलिसीटर जनरल यांनी दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असतानाही या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करून सुधारित वेळापत्रक सादर करावे, असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी दिले.

आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांतर्फे युक्तिवाद करणाऱ्या सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी नार्वेकरांचा जोरदार बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण सुप्रीम कोर्टाने त्यांचे सर्वच तर्क फेटाळून लावले. ही विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी आहे. त्यांनी दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांच्यासोबत बसून अपात्रता प्रकरणाचे नवे वेळापत्रक तयार करावे. पुढील सुनावणीपर्यंत हे वेळापत्रक कोर्टाला मिळाले नाही, तर कोर्ट स्वतः वेळापत्रक देईल, असा इशारा सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी नार्वेकरांना दिला. सुप्रीम कोर्टातील या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेना नेते अनिल परब व अनिल देसाई उपस्थित होते. एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे ही यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम