शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हात्रे व आमदार सुर्वेचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मार्च २०२३ । राज्यातील शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओवर अश्लिल मजकूर टाकण्यात आला आहे. त्यामुळे दहिसरमध्ये शिवसैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहिसरमधील रॅलीत सामील झाले होते. या रॅलीमधीलच शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर टाकून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे.

या प्रकाराबद्दल शीतल म्हात्रे यांनी सांगितले की, विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जातील, असे वाटले नव्हते. सोशल मीडियावरील मातोश्री नावाच्या अकांऊटमधून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. मातोश्री नावाच्या पेजवरुन महिलेची अशी बदनामी करणे, विरोधकांना शोभते का?, असा सवाल करत शीतल म्हात्रेंनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाला टोला लगावला. दरम्यान, हा व्हिडिओबाबत कळताच शिवसैनिकांनी काल रात्री दहिसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आरोपींवर विनयभंगासारखा गुन्हा दाखल करून असे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अद्दल घडवावी, अशी मागणी करत शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत एकाला अटक केली आहे. पोलिस इतरांचाही शोध घेत आहेत.
शीतल म्हात्रे यांनी मातोश्री नावाच्या पेजवर हा व्हिडिओ मॉर्फ करून घाणेरडा मजकूर लिहून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. या मॉर्फ व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे हा मध्यरात्री कार्यकर्त्यांसह दहिसर पोलीस ठाण्यात पोहोचला होता. यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम