शिवसेनेच्या जळगाव लोकसभा निवडणूकप्रमुख पदी सुनील चौधरी !
बातमीदार | ५ नोव्हेबर २०२३
देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून आता शिंदे गट देखील लोकसभेसाठी आतापासून कार्यकारिणी घोषित केली आहे. लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख म्हणून शिवसेना शिंदे गटाकडून अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची नियुक्ती केली आहे. याआधीच भाजपने या मतदारसंघासाठी डॉ. राधेश्याम चौधरी यांची नियुक्ती निवडणूक प्रमुख म्हणून केली आहे. आता शिंदे गटाने देखील लोकसभा निवडणूक प्रमुखाची नियुक्ती करून, जळगाव लोकसभेच्या जागेवर आपला दावा केला आहे.
शिवसेनेकडून गेल्या पंचवार्षिकपासून जळगाव लोकसभेसाठी दावा केला जात आहे. २०१९ मध्ये दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांनी लोकसभेसाठी तयारी सुरू केली होती. अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या लोकसभेसाठी निवडणूक प्रमुखाची नियुक्ती करून, शिवसेना शिंदे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सुनील चौधरी हे अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. तसेच चौधरी हे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील मूळ रहिवासी आहेत. सुनील चौधरी यांचे जळगावशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव लोकसभेत शिवसेनेची ताकद आधीपासून आहे. २०१९ मध्ये देखील आम्ही ही जागा मागितली होती. जळगाव ग्रामीण, पारोळा, पाचोरा तीन विधानसभा आमच्याकडे आहेत. जळगाव शहरात आमची ताकद आहे. त्यामुळे जळगाव लोकसभेसाठी आमची मागणी कायम आहे. शेवटी याबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील. आम्ही मात्र काम करत राहू.
– नीलेश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम