ठाकरेंच्या हातून पक्षनिधीसह शिवसेनेची मालमत्ता निसटला ?
दै. बातमीदार । १० एप्रिल २०२३ । राज्यातील ठाकरे गट व शिवसेनेच्या शिंदे गटाचा वाद आता वाढला असून यात शिंदे गटाने ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. कारण देखील तसेच काही आहे. शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी प्रमुखांकडे सोपवा अशी मागणी करणारी याचिका अॅडव्होकेट आशिष गिरी यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टात ही याचिका करण्यात आलीय.
पक्षाचा निधी आणि स्थावर मालमत्ता सध्याच्या प्रमुखांकडे देण्याची मागणी करण्यात आलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल योग्य असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे. शिवसेना भवन, पक्षाचा निधी आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात असं या याचिकेत नमुद करण्यात आलं आहे.
निवडणूक आयोगाचा निकाल योग्य
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला देण्याचा निकाल सुनावला होता. याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल योग्य असल्याचं आशिष गिरी यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, या याचिकेबरोबरच आपल्या याचिकेवर एकत्र सुनवाणी घ्यावी अशी मागणीही गिरी यांनी केली आहे.
आपला कोणत्याही पक्षाशी संबंध नसून आपण केवळ कायद्याच्या बाजूने असल्याचं गिरी यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय दिला तर नाव, चिन्ह सर्व त्यांना देण्यात यावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागला तर शिंदे गटाला सर्व मिळावं पण निकाल लागेपर्यंत पक्षाच्या निधी वापरावर निर्बंध लावण्यात यावे, असं गिरी यांनी याचिकेत म्हटलं आहे.
दरम्यान,या याचिकेशी शिंदे गटाशी काहीही संबंध नसल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. आम्ही पहिल्यांदा सांगितलं आहे, शिवसेना भवन मंदिर आहे, आम्हाला त्यांनी घडवलं आहे आम्हाला भवन आणि संपत्ती नको, कुणी याचिका दाखल केली असेल तर याचिका आणि आमचा संबंध नाही, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणार नाही, याचिका आणि आमचा संबंध नाही. आमचा त्या वकीलाशी संबंध नाही, हे पाप आम्ही करणार नाही अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली आहे. शिवसेनेची चल आणि अचल मालमत्तेसंदर्भात सुप्रीम कोर्टात जी याचिाक दाखल झाली त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही असं शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम