मुंबई मनसेला धक्का ; दमदार नेत्याने दिला राजीनामा !
दै. बातमीदार । २६ फेब्रुवारी २०२३ । गेल्या काही वर्षापासून मनसेला राज्यभरातील अनेक पदाधिकारी राजीनामा देत मनसेला राम राम करीत आहे. आता पुन्हा एकदा मनसेला मुंबईत धक्का मिळाला आहे. मनसेचे दमदार नेते म्हणून ओळखले जाणारे मनीष धुरी यांनी पक्षातील सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनसेचे दमदार नेते मनीष धुरी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे.
ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धुरी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मनसेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसेच्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर धुरी यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे म्हटलं आहे.
मनीष धुरी मनसेचे अंधेरी विभाग अध्यक्ष होते. धुरी हे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत. मनसेच्या अनेक आंदोलनात मनीष धुरी यांचा आक्रमक सहभाग होता. त्यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवून सर्वच पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पक्षात अचानक खळबळ उडाली. तसेच धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार अशी चर्चा आता रंगली आहे.
राज ठाकरे यांना पत्र लिहून मनीष धुरी यांनी सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दलही त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले. वैयक्तिक कारणामुळे मी सर्व पदांचे राजीनामे देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आहे. तर यापुढे पक्षात राज ठाकरे समर्थक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचाही शब्द त्यांनी पत्रात राज ठाकरे यांना दिला आहे. पश्चिम उपनगरातील पक्षांतर्गत गटबाजीमुळेच धुरी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बांधणी सुरू केली आहे. मनसेनेही पक्ष बांधणीवर मोठा भर दिला आहे. अशातच धुरी यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम