आरोग्य मंत्री दाखवा व एक लाख मिळवा ; ठाकरे गटाची टीका
दै. बातमीदार । २९ नोव्हेबर २०२२ । राज्यात ‘ठाकरे सरकार’ सत्तेवर असतांना कोरोना संकटकाळात सतत दोन वर्षे मुख्यमंत्री ठाकरे एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेची काळजी घेत होते. पण आज मुंबई-महाराष्ट्र गोवर साथीच्या विळख्यात सापडला असताना ‘आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा’ असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली आहे. ठाकरेंनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मिंधे गटाचे आमदार आजही खोक्यांची शय्या करून झोपले आहेत, पण गोवरच्या त्रासाने लहान मुले, त्यांचे पालक हैराण आहेत. चीनमध्ये कोरोना लॉक डाऊनविरोधात जनतेने उठाव केला. तसे मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झाले. अर्थात कामाख्या देवीच्याच मनात तसे काही असेल तर कोणी काय करावे?
ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज राज्यातील गोवर साथ व त्यावरील उपाययोजनांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
कोरोना संकटासाठी तयार आहात का?
ठाकरेंनी म्हटले आहे की, चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने तर महाराष्ट्रात गोवरच्या साथीने हाहाकार माजवला आहे. गोवरचे संकट आहेच, पण ज्या पद्धतीने चीनमध्ये कोरोना पसरला आहे ते पाहता महाराष्ट्राला सावधान राहायला हवे. गोवर आणि कोरोनाच्या बातम्या चिंता वाढविणाऱ्या आहेत. मुंबईसह राज्यभरात गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या दहा हजारांवर गेली. त्यातले सर्वाधिक ‘गोवर’ रुग्ण मुंबई शहरात आहेत. त्याच वेळी चीनमध्ये रविवारी एकाच दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारांवर पोहोचली व आकडा वाढतोच आहे. कोरोनामुळे मृतांची हजारो प्रेते गंगेत सोडून देण्यात आल्याचे चित्र जगाने पाहिले. आता ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून हिंदुस्थान तयार आहे काय?
खोकेबाज आरोग्यमंत्र्यांनी अभ्यास करावा
ठाकरेंनी म्हटले की, राज्याराज्यांतील सरकारे पाडून वगैरे ही लढाई पुढे जाणार नाही पिंवा ‘ईडी’वाल्यांच्या हातात शस्त्र देऊनही कोरोना घाबरून पळ काढणार नाही. कोरोनाप्रमाणेच गोवर हा आजार संपर्क व स्पर्शातून पुढे जाऊ शकतो. ते टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार, आरोग्य मंत्रालयाने कोणती पाऊले उचलली आहेत? लसीकरण वगैरे वाढविण्याचे बोलले जात आहे, पण ते सर्व कागदावरच दिसतेय. गोवरसंदर्भात दिल्लीत एक उच्च स्तरीय बैठक होऊन गोवरच्या साथीचा आढावा घेण्यात आला. गोवरसंदर्भात मार्गदर्शक नियमावली महाराष्ट्र राज्यासाठी जारी केली गेली. त्या नियमावलीचा अभ्यास सर्वप्रथम राज्याच्या खोकेबाज आरोग्यमंत्र्यांनी करायला हवा.
मोदी सरकार गुजरात निवडणुकीतच व्यस्त
ठाकरेंनी म्हटले आहे की, आज मोदी व संपूर्ण सरकार गुजरात विधानसभा निवडणुकीत रंगलंय आणि गुंतलंय. त्यांचे सर्व राजकीय हल्ले सुरू आहेत ते काँगेस आणि राहुल गांधींवर. आजही त्यांना राहुल गांधी हेच त्यांच्यासमोरील ‘संकट’ वाटत आहे. देशासमोरील इतर सर्व संकटे गौण ठरवून गुजरात निवडणूक जिंकणे हीच त्यांची ईर्षा दिसते, पण चीनच्या सीमेवर कोरोनाचे संकट पुन्हा उभे आहे व ते केव्हाही वावटळीसारखे आपल्याकडे घुसू शकते. ते संकट चीनबरोबरच्या चर्चेने सुटणार नसून त्या संकटाशी लढण्यासाठी पुन्हा एकदा आरोग्यविषयक ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ची उभारणी करावी लागेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम