गांधी यांना कुणी तरी समजवा ; शिवसेना का म्हटली?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० नोव्हेबर २०२२ वि. दा. सावरकरांबद्दल कॉंग्रसे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांचे पडसाद राज्यभरात उमटले. अशातच शिवसेनेने त्यांचे मुखपत्र सामनातून आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. राहुल गांधी यांना कोणीतरी समजवा असे शिवसेनेने म्हटले आहे.

सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर सावरकरांच्या पत्राचा दाखला देत राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले. आता यावर शिवसेनेने रोखठोकमधून आपली भूमिका मांडली आहे.

वीर सावरकरांवर नाहक टीका करून राहुल गांधी यांनी वादळ ओढवून घेतले. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले. त्या यात्रेस वीर सावरकरांवरील नाहक टीकेने गालबोट लागले. अंदमानच्या तुरुंगात सावरकरांनी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ नरकयातना भोगल्या त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठीच, हे राहुल गांधी यांना कोणीतरी समजावून सांगायला हवे. असे रोखठोक मध्ये म्हटले आहे.

गांधी यांचा प्रश्न योग्य आहे, पण त्यांनी सावरकरांची माफी हा विषय काढला आणि गोंधळ झाला. मात्र दुसऱ्या दिवशी शेगावच्या जाहीर सभेत त्यांनी सावरकरांबद्दल मौन बाळगले, हे एका अर्थाने योग्यच झाले. तरीही त्यांना सांगावेसे वाटते की, तुम्ही वारंवार लोकांच्या श्रद्धांना असे का डिवचता व भाजपला विषयांतर करण्यासाठी हत्यार का देता? मी स्वतः तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात होतो. या तुरुंगातही अनेक स्वातंत्र्यवीरांचा मुक्काम 1947 पर्यंत होता.

त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ एक स्तंभही ऑर्थर रोड तुरुंगात आहे. एक सामान्य बंदी म्हणून तुरुंगात दिवस काढणेही कठीण असते. वीर सावरकरांनी तर अंदमानात 10 वर्षांपेक्षा जास्त काळ घालवला. बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यात किंवा मनीलाँडरिंग प्रकरणाचा खोटा गुन्हा लादून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली नव्हती. भारतमातेच्या पायातील पारतंत्र्याच्या बेडय़ा तोडण्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली. त्यासाठी त्यांना अंदमानचे काळे पाणी भोगावे लागले!

अटकेत असलेला कोणताही बंदी त्याच्या सुटकेसाठी हरतऱहेचे कायदेशीर प्रयत्न करीत असतो. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ अंदमानात नरकयातना (देशासाठी) भोगल्यावर सावरकरांनी ‘डावपेच’ म्हणून दिलगिरी व्यक्त करून सुटकेचा मार्ग निवडला असेल तर त्यास शरणागती-माफीनामा म्हणता येणार नाही.

आज ‘ईडी’सारख्या स्वतंत्र हिंदुस्थानातील तपास यंत्रणांच्या भयाने भले भले एका रात्रीत ‘स्वदेशी’ सरकारला शरण जातात. पक्ष बदलतात. स्वतःच्या निष्ठा विलीन करतात. सावरकरांनी दशकभर अंदमानात ज्या यातना सहन केल्या त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ने जी सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास निर्माण केला त्यावर सावरकरांवरील भाष्याने पाणी पडल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम