पाऊस नसल्याने राज्यातील पेरण्या खोळंबल्या !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जून २०२३ ।  देशात गेल्या काही दिवसपासून बदलत्या हवामानातून तर मान्सूनचा महिना सुरु जरी झाला असला तरी अनेक जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्यातील सरासरी पर्जन्यमानापैकी एकाही तालुक्यात ५० टक्के एवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्यामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी खरीप पिकासाठी शेतीची मशागत करून ठेवली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणे, खते देखील खरेदी केले आहेत. मात्र पाऊस रोज गुंगारा देत आहे. नाशिक जिल्ह्याचे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान ९३.० मिलिमीटर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त सरासरी १८.९ मिलिमीटर एवढाच पाऊस झालेला आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत ५०.४ मिलिमीटर एवढा पाऊस झाला होता. पाऊस लांबल्याने या वर्षाचा खरीप हंगाम देखील लांबणीवर पडणार आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यातील इगतपुरी, येवला व त्रंबकेश्‍वर वगळता सर्व तालुक्यात १७ जूनपर्यंत दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे जूनअखेर जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पेरण्यांची कामे वेगाने सुरु होती. यावर्षी नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, येवला, चांदवड या तालुक्यात तर नाममात्र पाऊस झाला आहे. जूनच्या सरासरीच्या तुलनेने कळवण, मालेगाव, बागलाण, देवळाली या चार तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. पाऊस लांबल्याने मका, बाजरी, कपाशी, भात आदी प्रमुख पिकांची पेरणी खोळंबल्याने शेतमजुरांनाही पुरेसा रोजगार मिळत नाही. शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. २५ जूननंतर पाऊस येईल असा अंदाज वर्तविला जात असल्याने या वर्षी पेरण्या जुलैमध्येच होण्याची शक्यता आहे. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम