सलग तेरावा श्रीलंकेचा वनडे विजय !
बातमीदार | १० सप्टेंबर २०२३
सदिरा समरविक्रमा आणि कुसाल मेंडिस यांच्या धडाकेबाज फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने शनिवारी आशिया कपमधील सुपर फोर लढतीत बांगलादेशवर २१ धावांनी विजय मिळवला. एकदिवसीय सामन्यातील हा श्रीलंकेचा सलग १३ वा विजय ठरला. या पराभवामुळे बांगलादेशचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
नाणेफेक जिंकून बांगलादेशने श्रीलंकेला फलंदाजीचे निमंत्रण दिले. ५० षटकांत ९ बाद २५७ धावा करत लंकेने बांगलादेशला ४८.१ षटकांत २३६ धावांवर रोखले. सदिरा समरविक्रमा सामनावीर ठरला.
विजयासाठी २५८ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचे मोहम्मद नईम (२१), मेहदी हसन मेराज (२८) यांनी ५५ धावांची सलामी दिली. त्यानंतर लिटन दास, शाकीब अल हसन, मुशफिकूर रहीम हे मोठी खेळी करू शकले नाहीत. तौहिद ह्यदोय याने एकाकी झुंज देताना ९७ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह ८२ धावा केल्या. पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. श्रीलंकेकडून महिश तीक्ष्णा, दासून शनाका आणि मथिशा पथिराना यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. त्याआधी, श्रीलंकेचे सलामीवीर झटपट परतल्यानंतर पथुम निसांका (४०) सोबत मेंडिसने दुसऱ्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी केली. मेंडिसने ७३ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह ५० धावांचे योगदान दिले. सदिरा समरविक्रमाने ७२ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह ९३ धावा केल्या. त्याने कर्णधार दासून शनाका (२४) याच्यासोबत सहाव्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी केली. बांगलादेशच्या हसन मेहमूद, तस्कीन अहमद यांनी ३-३ तर शरीफुल इस्लामने दोन बळी घेतले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम