बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा ; उद्धव ठाकरे !
बातमीदार | १० ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे ओढवलेल्या संकटात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे उभारा, पीक विम्याचा आढावा घेऊन त्यांना सहकार्य करा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
ठाकरे यांनी पावसाअभावी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव पदाधिकाऱ्यांना करून दिली. राज्यात यंदा पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी दिवसागणिक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता निम्म्यापेक्षा खाली आली आहे. काही ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके नुकसानीच्या खाईत गेली आहेत. सुमारे २४ जिल्ह्यांतील ८९० महसुली परिमंडळात तब्बल २५ दिवस पावसाने दांडी मारली होती. पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पीक विम्यासाठी केलेल्या अर्जांना कंपन्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. यामुळे शिवसैनिकांनी शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे उभारावीत. यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळतोय की नाही, याची माहिती घेऊन तो मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करा. शिवसेनेमार्फत शेतकऱ्यांना शक्य ते सर्व सहकार्य करावे, अशा सूचना ठाकरेंनी दिल्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम