भुसावळमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई: तपशील गुलदस्त्यात
भुसावळ: राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे भरारी पथक आज भुसावळ विभागात दाखल झाले आहे. मात्र, कोणत्या बियर बार, परमिट रूम किंवा देशी-विदेशी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे देशी-विदेशी दारू विक्रेते आणि परमिट रूम बार चालकांमध्ये चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने २५ मे २०२४ रोजी भुसावळ विभागातील सर्व परवानाधारकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. यात सावदा, फैजपूर आणि भुसावळ परिसरातील देशी-विदेशी दारू विक्रेत्यांची दुकाने कधी उघडतात आणि बंद करतात, स्टॉक कसा आणि कधी वाहतूक होतो, हे तपासण्याचे निर्देश होते. भरारी पथकाने आज भुसावळ विभागात कारवाई केली असली तरी, नेमकी कुठे आणि कोणावर कारवाई झाली, हे अजून समोर आलेले नाही.
**दंडात्मक कारवाईची तरतूद**
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार, मद्यविक्रीची दुकाने सकाळी १० वाजेपूर्वी उघडू नयेत, असा नियम आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर २० ते २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. वाइन शॉप आणि देशी दारू विक्रीच्या दुकांनदारांना हा नियम लागू आहे.
**पालकांची चिंता**
शहरातील बिअर बार, वाईन शॉप आणि देशी दारूच्या दुकानांमध्ये युवकांची संख्या वाढत असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. मुलांवरील नियंत्रण कमी झाल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम