
शिंदे गटातर्फे “या” कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू
दै. बातमीदार । २९ सप्टेंबर २०२२ । एकनाथ शिंदे गटातर्फे बीकेसीमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटातील नेत्यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमनजीकच्या गरवारे क्लबमध्ये या मेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली.
ह्या दसरा मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे भाषण होणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, याबाबत शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी “अद्याप अन्य नेत्यांना निमंत्रित करण्याचे कोणतेही नियोजन नाही, परंतु हिंदुत्ववादी विचारधारणा मान्य असलेल्यांचे सम्मानपूर्वक स्वागत करण्यात येईल. मात्र, या विचारधारेशी फारकत घेतलेल्यांना कार्यक्रमात स्थान नाही” असे म्हटले आहे. मागील काही दिवसांत दोनवेळेस राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने मेळाव्यात राज ठाकरेंचे भाषण होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
यावर केसरकर यांनी “दसरा मेळावा उत्साहातच होईल, प्रत्येक विभागाची जोरदार तयारी सुरू असल्याने हा उत्तम दिवस विचारांचे सोने लुटण्याकरता निवडलेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर एकनाथ शिंदे चालत राहिले आहेत. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कारभार सांभाळून लोकांना भेटत असल्याने मंत्रालयात गर्दी असते”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसऱ्याच्या शुभदिनी अजून काही जणांचे पक्षात आगमन होईल, असा गौप्यस्फोट करीत बरेच जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक असल्यामुळे त्यांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील, असे विधान केले आहे.
दरम्यान, या मेळाव्याला अंदाजे अडीच ते तीन लाख लोक येणार असल्याकारणाने येणाऱ्या वाहनांसाठी दहा ग्राउंड्सची बुकिंग केली आहे. तसेच येणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची व्यवस्थित सोय करण्याच्या सूचनाही शिंदेंनी दिल्या आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम