
जळगाव तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा; मनसेने तहसीलदारांना दिले निवेदन
जळगाव तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा; मनसेने तहसीलदारांना दिले निवेदन
जळगाव : जळगाव तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेला वाळू आणि मुरुमाचा उपसा तात्काळ थांबवावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी (२३ सप्टेंबर) केली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने दुपारी १२ वाजता तहसीलदार शीतल राजपूत यांना निवेदन देऊन पुढील पाच दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या जळगाव तालुक्यात गौण खनिजांचा, विशेषतः वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. धानोरा, म्हसावद, आव्हाणे, खेडी यांसारख्या गावांमध्ये गिरणा नदीच्या पात्रातून वाळू काढली जात असून, यामुळे नदीपात्रांची खोली वाढत आहे, जे पर्यावरणासाठी धोकादायक आहे.
मनसेच्या मते, वाळू माफिया आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत; रात्री इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळू काढून ती डंपरने शहरात आणली आणि विकली जाते. निवेदनात असा आरोपही करण्यात आला की, काही सरकारी अधिकारी, तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकारी या बेकायदेशीर उपसा सुलभ करण्यात अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत.
मनसेने या सर्व बेकायदेशीर वाळू व्यावसायिकांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने ही मागणी दुर्लक्ष केली तर मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम