दै. बातमीदार । २४ नोव्हेबर २०२२ । चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या 24 तासांत चीनमध्ये विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एका दिवसात 31 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. पुन्हा जगाचं टेंशन वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनासमोर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. सरकारकडून पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्घ पाहता या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. हे पाहता चीन सरकारने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. बीजिंगसह इतर अनेक भागात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने तेथील शॉपिंग मॉल्स आणि रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय काही उद्याने आणि जिमही बंद करण्यात आली आहेत. अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारकडून कोरोना चाचण्यावर भर दिला जात आहे.
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर
चीनमध्ये एका दिवसात विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 31656 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. याआधी एप्रिल 2022 मध्ये 29,390 रुग्ण आढळले होते. चीनमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान भारतातही कोरोनाचा संसर्ग किंचित वाढताना दिसत आहे.
सार्वजनिक ठिकाणी कोविड रिपोर्ट अनिवार्य
चीनमध्ये कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता कोविडचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. अनेक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आजपासून राजधानी बीजिंमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी 48 तास आधी निगेटिव्ह पीसीआर कोविड चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच लोकांना आता शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, सरकारी कार्यालयात जाण्यासाठी कोविड रिपोर्ट दाखवावा लागेल. यासोबतच लोकांना गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बीजिंगमध्ये शाळा बंद
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. बीजिंगमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता चीन सरकारने बीजिंगमधील अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद केल्या आहेत. शासनाने शाळांना ऑनलाईन शाळा घेण्याचे निर्देश दिले आहेत. बीजिंगमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम