ठाकरे गटाने लोकसभेसाठी आखली रणनीती ; होणार मोठे बदल !
दै. बातमीदार । १७ मे २०२३ । देशात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आता तयारीला लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखली आहे. ठाकरे गटाने मुंबईतील अनेक मतदारसंघात उमेदवार बदलण्याची तयारी केली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहा असा आदेश पदाधिकाऱ्यांना दिला आहे. शिवसेना भवनवर झालेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली आहे. मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील अनेक उमेदवार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतून सध्याचे खासदार अरविंद सावंत यांच्या जागी राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा असून त्यांना संधी दिली जाऊ शकते. तसंच अरविंद सावंत यांना उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या पूनम महाजन यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाऊ शकते. दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे.
तसंच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दिना पाटील किंवा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्याबाबत शिवसेना ठाकरे गोटात अंतिम चर्चा सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. माजी महापौर आणि आमदार सुनील प्रभू यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना मतदारसंघात काम करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा अवधी असतानाही ठाकरे गटाच्या उमेदवारांना मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयार राहा असा आदेश पदाधिकाऱ्यांना दिला आहे. शिवसेना पदाधिका-यांच्या शिवसेना भवनवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिले आहेत. भाजप म्हणतंय की, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागतील, त्यादृष्टीने आपणही तयार राहा, गाफील राहू नका अशी सूचना उद्धव ठाकरेंनी केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम