…प्रत्येकाच्या पाठीत ठाकरेंनी खंजीर खुपसला ; फडणवीसांचा घणाघात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ ।  २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसच नाही तर भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला असं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही. ज्या भाजपाच्या कार्यकर्त्याने पक्ष उभा केला, जो भाजपा कार्यकर्ता उद्धव ठाकरेंसाठी लढला त्याच्या प्रत्येकाच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच महाभारताचे संदर्भ देत जोरदार टीकाही केली. २०१९ ला जनादेशाची हत्या कुणी केली? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. तुम्ही बघा मोदींचे मोठमोठे फोटो लावून मतं मागितली होती. त्यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि मग तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर जाता? हा दगा, हा खंजीर देवेंद्र फडणवीसच्या पाठीत नव्हता, देवेंद्र फडणवीस निमित्त होतं. हा खंजीर भाजपाच्या पाठीत खुपसला. ज्या भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो पक्ष उभा केला त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता.

याचं उत्तर देणं आपल्याला गरजेचं होतं. त्यावेळी मला अमित शाह यांनी सांगितलं की तू दहा अपमान सहन कर, पण बेईमानी सहन करु नको. जो बेईमानी सहन करतो तो टिकत नाही हे मला अमित शाह म्हणाले होते. ज्या भाजपा कार्यकर्त्यांनी उद्धवजींचा पक्ष जिंकण्यासाठी घाम गाळला ही त्यांच्याशीही बदनामी होती. म्हणून एकच गोष्ट सांगायची की आज आपण जे करतो आहे तुमच्या मनात शंका असू देऊ नका. आपण जे वागलो तो धर्म आहे, अधर्म नाही. कर्णाची कवच कुंडलं काढल्याशिवाय कर्णावर विजय मिळवता येणार नाही हे कृष्णाला माहित होतं. दुर्योधनाला गांधारीकडे जाताना कपडे घालायला लावले. भीष्मांना पराभूत करण्यासाठी शिखंडीला उतरवलं. सूर्यास्त भासवून जयद्रथ वध करवला. सर्वात महत्त्वाचं द्रोणाचार्यांचा वध करताना धर्मराजाला सांगितलं तुला खोटं बोलायचं आहे त्यावेळी धर्मराज युधीष्ठीराने सांगितलं की मी सांगेन अश्वत्थामा गेला हे सांगेन पण नरो वा कुंज रोवा म्हणजे नर मारला की हत्ती मारला गेला माहित नाही.
कृष्णाने काय केलं? युधीष्ठीर वाक्य म्हणत असताना इतक्या जोरात शंख वाजवला की द्रोणाचार्यांना अश्वत्थामा गेला इतकंच ऐकू आलं. त्यामुळे महाभारताने आपल्याला सांगितलं की हा अधर्म नाही ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल. परित्राणाय साधूनाम लक्षात आहे पण विनाशाय दुष्कृताम हे देखील लक्षात ठेवावंच लागेल. अनेक लोक नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करत आहेत. पण नैतिकतेने राजकारण करण्यासाठी राजकारणासह रहावं लागतं. महाभारतात श्रीकृष्णाला माहित होतं की धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावी लागते. लोक म्हणतात तुम्ही दोन पक्ष फोडले, कुणी म्हणतं तुम्ही घर फोडलं. मला विचारायचं आहे की २०१९ ला जनादेशाची हत्या करण्याचं काम कुणी केलं. पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना एकच सवाल आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काय काल राजकाणात आले आहेत का? मी मोहिनी घातली आणि ते माझ्या मागे आले. असं घडलेलं नाही. ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या-त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम