तो आरोपी शिंदे गटात ; संजय राऊतांचा आरोप !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ जून २०२३ | राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मयूर शिंदे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, आरोपी मयूर शिंदेचे संजय राऊत व आमदार सुनील राऊत यांच्या बरोबरचे फोटो जारी करत संजय राऊतांनीच धमकीचा हा बनाव रचला, असा आरोप भाजपने केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना जाहिरात कांडावरून लक्ष उडवण्यासाठीच हा बनाव रचला आहे, असा उलट आरोप संजय राऊतांनी शिंदे सरकारवर केला आहे.

दरम्यान, संजय राऊतांना पोलिस संरक्षण मिळावे, यासाठी मयूर शिंदेने धमकीचा बनाव रचल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यावर टीका करताना आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, मुळात ठाणे परिसरातील सर्व गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक एकतर भाजपात आहेत नाहीतर सध्याच्या शिंदे गटात आहे. त्यामुळे हे लोक आमच्यासाठी असे काही करतील यावर कोणी मूर्खसुध्दा विश्वास ठेवणार नाही. हे बनावट प्रकरण त्यातीलच आहे.

मयूर शिंदे हा ठाकरे गटाचाच कार्यकर्ता असल्याचा दावाही भाजप नेत्यांनी केला होता. त्यावर संजय राऊत म्हणाले, मयूर शिंदेसोबत माझे फोटो आहे म्हणून मी त्याला माझ्या धमकीचा बनाव रचायला लावला, असे म्हणणे चुकीचे आहे. यापूर्वी मला पुण्यातून धमकी आली होती. पोलिसांनी याप्रकरणी ज्या आरोपीला अटक केली, त्या आरोपीचे तर भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी त्या आरोपीला मला धमकी द्यायला लावली, असे म्हणायचे का? संजय राऊत म्हणाले, मयूर शिंदे हा ठाण्यातील असल्याचे समजते आहे व ठाण्यातील सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकतर भाजपमध्ये आरे किंवा शिंदे गटात आहेत. मयूर शिंदे हा देखील आधी ठाकरे गटात होता. त्यानंतर त्याने मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचे फोटोही सर्व माध्यमांकडे आहे. त्यानंतर आता तो शिंदे गटात असल्याची माहिती आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम