सोहळ्याची होणार इतिहासात नोंद ; पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज गौरव !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ एप्रिल २०२३ ।  राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे.

या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सोहळ्याच्या आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी आवाहन केले आहे.

सकाळी साडे दहाच्या सुमारास हा सोहळा होणार आहे. त्यासाठी महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सदस्य त्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक, श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजनपूर्वक काम सुरू आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहन तळ, वाहतूक सुरळीत राहण्यासाठीचे नियोजन याकडे लक्ष देण्यात येत आहे. नागरिकांना रेल्वे स्थानकापासून ते सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यासाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम