राज्यात ५ दिवसात लसीकरण ५ पट वाढले ; आरोग्यमंत्री सावंत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ डिसेंबर २०२२ । देशात कोरोनाचे थैमान वाढत आहे त्याच अनुषगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता खबरदारी घेण्याचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री सावंत यांनी केले आहे. कोरोनाचा बीएफ-७ व्हेरिएंटचे देशात रुग्ण सापडल्यापासून महाराष्ट्र सतर्क झाला आहे. ५ दिवसांत लसीकरणाचे प्रमाण ५ पट वाढले आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, ‘कोविशील्डचे आणखी १० लाख डोस मागवले असून ते दोन दिवसांत मिळतील. २७ डिसेंबरला मॉक ड्रिलद्वारे राज्यातील शहरी व ग्रामीण आरोग्य यंत्रणांची चाचणी घेतली जाईल.’

नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही. कोरोनाचे फक्त १३६ सक्रिय रुग्ण आहेत. ९५ टक्के लोकांनी लसीचा एक तरी डोस घेतला आहे. बूस्टर डोसचे प्रमाण ६० ते ६५ % आहे. त्यामुळे घाबरून न जाता ख्रिसमस, न्यू इयर सेलिब्रेशन जोमाने साजरे करा, मात्र गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले. दरम्यान, शनिवारी दिवसभरात ३८ नव्या रुग्णांची भर पडली तर ३५ जण बरे झाले. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढला असल्याने केंद्र सरकारनेही खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये वाढ केली आहे. खासकरून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर निगराणी ठेवली जात आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून येणाऱ्या विमान प्रवाशांंना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी शनिवारी दिली. चाचणीत कोरोनाची लक्षणे आढळल्यास अथवा पॉझिटिव्ह निघाल्यास प्रवाशाला विलगीकरणात राहावे लागणार आहे. चीन, जपान, सिंगापूर, बँकाॅकहून येणाऱ्या प्रवाशांवर एअर सुविधा पोर्टलद्वारे निगराणी केली जात आहे.
या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट प्रथम पोर्टलवर टाकावे लागणार आहेत, असे मांडविया यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, इंदूर आणि गोवा विमानतळावर येणाऱ्या काही प्रवाशांचीही चाचणी (रँडम सम्पलिंग) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परदेशातून येणाऱ्या किमान २ टक्के प्रवाशांचीही रँडम चाचणी केली जात आहे.
औरंगाबादच्या विमानतळावर प्रवाशांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्याप इथे चाचणी सुरू केलेली नाही, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. नागपुरात परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे, तर दोन टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम