मराठा आरक्षणाच्या लढयास सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज – जरांगे-पाटील !
बातमीदार | २० नोव्हेबर २०२३
मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या लढ्याला सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज आहे, असे मत मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले. ते रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे जिजामाता समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी दौऱ्यावर निघालेले मनोज जरांगे-पाटील शनिवारी रात्री पोलादपूरमार्गे पाचाड येथे दाखल झाले. सकाळी जिजामाता समाधीचे दर्शन घेऊन ते किल्ले रायगडच्या दिशेने रवाना झाले. महाराजांच्या राजसदरेवरील पुतळ्यास व समाधीस्थळास त्यांनी भेट दिली आणि अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ते मिळत नाही तोवर संघर्ष सुरूच ठेवणार आहे. या लढ्याला सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज आहे, त्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. कोकणातील राजकीय नेत्यांनी यापूर्वी जरी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केला असला तरी आता ते करणार नाहीत. त्यावेळी कोणाच्या तरी दबावामुळे कोकणातील नेत्यांनी तसा विरोध केला असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा समाजावरील अन्यायाविरोधात सुरू केलेल्या लढ्याला पुन्हा जोमाने सुरुवात करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
घटनेच्या पदावर बसलेले काही जण वाद निर्माण करू पाहत आहेत. जाती-जातीत तणाव निर्माण करू लागले आहेत. दंगली भडकवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. पण त्यांना सल्ले देणार नाही आणि महत्त्वही देणार नाही. आजवर छगन भुजबळांशी आमचा वैचारिक वाद होता. पण आता व्यक्ती म्हणूनही त्यांचा राग येऊ लागला आहे. मराठा समाज राज्यात अशांतता निर्माण होऊ देणार नाही. पण कोणी कितीही विरोध केला तरी आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचेही जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा आरक्षण दृष्टिक्षेपात असून समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही त्यांनी मराठा समजातील तरुणांना केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम