देशात पावसाचा कहर वाढला ; ५६ जणांचा दुर्देवी मृत्यू
दै. बातमीदार । ११ जुलै २०२३ । देशातील अनेक भागात पावसाचा जोरदार कहर सुरु असून यात यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्लीसह सात राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या परिणामी हिमाचल प्रदेशातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. नदीच्या काठावर बांधलेल्या इमारती कोसळल्या आहेत. जवळपास सर्वच प्रमुख नद्या ओसंडून वाहत आहेत. पूल तुटले असून रस्ते पाण्याने भरले आहेत.
हिमाचल प्रदेशातील अंबाला-यमुनानगर रस्त्यावर एक बस पुराच्या पाण्यात उलटली. पलटी झालेल्या बसच्या वर अनेक लोक उभे होते, त्यांना स्थानिक लोकांनी दोरीच्या साहाय्याने वाचवले आणि क्रेनला दोरी बांधून बस बाहेर काढली. राजस्थानच्या जयपूरमध्ये मुसळधार पावसामुळे सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. पंजाबच्या रुपनगरमध्ये पावसामुळे सतलज नदीला आलेल्या पुरामुळे काही भाग प्रभावित झाला आहे.
दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. धोक्याचे चिन्ह 204.50 मीटर असून सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत पाण्याची पातळी 204.63 मीटर नोंदवण्यात आली आहे. दुपारी एक वाजता हथिनीकुंड बॅरेजमधून 1 लाख 90 हजार 837 क्युसेक पाणी यमुनेमध्ये सोडण्यात आले. राजस्थानच्या अजमेरमध्ये मुसळधार पावसामुळे सागर तलाव ओसंडून वाहत आहे. दिल्लीचे पीडब्ल्यूडी मंत्री आतिशी यांनी बोटीत बसून यमुना नदीचा आढावा घेतला. हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये बियास नदीच्या काठावर बांधलेली इमारत कोसळून वाहून गेली. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रावी नदीला पूर आला आहे. नदीलगत असलेली अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत.
हिमाचल प्रदेशातील मंडीच्या थुनागमध्ये ढगफुटीमुळे अचानक पूर आला. यमुनेच्या पाण्यामुळे हरियाणातील कर्नालमधील अनेक गावांना पूर आला आहे. एनडीआरएफचे पथक बचावकार्य करत आहे. हरियाणातील अंबाला येथे मुसळधार पावसामुळे मनमोहन नगरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे मुसळधार पावसामुळे पंचवक्त्र मंदिर पाण्यात बुडाले. उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये पावसामुळे भीमावाला बोट जेटीजवळ पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम