गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याला सर्वाधिक मागणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ मार्च २०२३ ।  हिंदू धर्मातील अनेक सणाला आंब्याला महत्व दिले जात असते. तर मार्च महिन्यात येणाऱ्या गुढीपाड्व्याला देखील आंब्याला महत्व आहे. सध्या डिसेंबर आणि जानेवारी दरम्यान आंबा पिकाला चांगला मोहर फुटला असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून देण्यात येत होती. दरम्यान अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे ज्या काळात आंबा पिकाला फळे लागण्याची प्रक्रिया सुरू होते त्याचदरम्यान वादळी पावसामुळे आंबा पिकावर मोठा परिणाम झाला. मागच्या काही दिवसातील वातावरण बदलामुळे आंबा पिकाचा मोहोर गळून पडल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवादिल झाला आहे.

याचबरोबर गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा मार्केटला आल्याने नागरिकांनी आंबा घेण्याची पसंदी दर्शवली आहे. परंतु आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण होत असल्याने आंबा उत्पादन घटत आहे. यामुळे आंब्याचे दर पुढील काही काळात वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस पडला तर मोठे नुकसान होण्याची चिंता बागायतदारांना सतावत आहे. यंदा आंबा पीक उशिरा येणार असून गतवर्षीपेक्षा 30 ते 40 टक्के उत्पादन घटणार असल्याची स्थिती आहे.

पाडव्याच्या पूर्वसंध्येला सध्या बाजारात एक डझनाला आंबा अंदाजे 1 हजार ते 1500 रुपयांपर्यंत मिळत आहे. दरम्यान पुढील काही दिवस हाच दर राहण्याची शक्यता आहे. यामुळे आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. घाऊक बाजारात पेटीचा दर सरासरी तीन हजार रुपये आहे.यंदा फेब्रुवारीपासूनच हापूस आंबा बाजारात दिसत होता. मार्चमध्ये त्यामध्ये थोडी वाढ झाली असली, तरी आवक कमीच आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या दोन दिवसांपूर्वी 19 पेट्या व 1190 बॉक्स हापूस आंब्याची आवक झाली होती.

पेटीचा दर सरासरी तीन हजार रुपये तर बॉक्सचा दर सरासरी सहाशे रुपये राहिला. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी काळात हापूसची आवक तशी जेमतेमच राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. साधारणता आणखी पंधरा ते वीस दिवसांनी आवक वाढण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याला आंब्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर आवक थोडी वाढणार असली, तरी दरात वाढ होणार आहे. लहरी वातावरणामुळे वर्षाआड आंब्याचे पीक हाती येत असल्याची चिंता आहे. सध्याच्या वातावरणात मोहोर दिसत असला तरी तो फुलणारा नसल्‍याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम