शांतताप्रिय चाळीसगावमध्ये गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट

बातमी शेअर करा...

शांतताप्रिय चाळीसगावमध्ये गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट

गोळीबार प्रकरणाच्या तपासात ३ पिस्तुलांसह ६ जिवंत राऊंड जप्त; शहरात खळबळ

चाळीसगाव प्रतिनिधी पूर्वीपासून शांतताप्रिय शहर म्हणून ओळख असलेल्या चाळीसगावमध्ये आता गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे चित्र समोर येत असून, शहरात गावठी कट्टे आढळू लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पुढील तपासात या शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्याच्या घरावर छापा टाकण्यात आला असता आणखी एक गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंड मिळून आले. दोन स्वतंत्र कारवायांत पोलिसांनी एकूण ३ गावठी पिस्तुले, ६ जिवंत राऊंड व ४ रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी लक्षात घेता ‘२०२६ हे चाळीसगाव सुरक्षित शहर’ ही संकल्पना राबविण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे. या अंतर्गत नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येत असून बँका, सराफ बाजार, मुख्य बाजारपेठ, बस स्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात नियमित गस्त घालून संशयितांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच कॉलनी परिसर व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर रात्रीची गस्त व पेट्रोलिंगदरम्यान विशेष नजर ठेवण्यात येत आहे. याच अनुषंगाने दि. १९ डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरातील गोळीबार प्रकरणात दाखल भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३५२, ३५१ (१)(२), ३ (५) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी दीपक सुभाष मरसाळे (रा. सुवर्णाताई नगर) व अतुल गोकूळ कसबे (रा. इंदिरा नगर, बस स्थानकामागे) यांना पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी यांच्या पथकाने धुळे रोड परिसरातून शिताफीने अटक केली. न्यायालयात हजर करून चार दिवसांची पोलीस कोठडी घेतल्यानंतर चौकशीत त्यांनी गावठी कट्टे लक्ष्मण प्रथमेश भामरे (रा. स्वामी समर्थ नगर, नागद रोड) व अमीर शेख शमशोद्दीन शेख (रा. नागद रोड, पाण्याच्या टाकीजवळ) यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांच्या घराची झडती घेतली असता प्रथमेश भामरे याच्या घरातून एक गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंड मिळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मोहन सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार विनोद पाटील, भूपेश वंजारी, प्रवीण जाधव, नितीन वाल्हे, नरेंद्र चौधरी, राकेश महाजन, विलास पवार, गोपाल पाटील तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल मयुरी शेळके यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम