राज्याचा राजा तुपाशी तर शेतकरी उपाशी ; विरोधकांचा हल्लाबोल !
बातमीदार | १६ सप्टेंबर २०२३
राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांच्यासह अख्खे मंत्रिमंडळ आज छत्रपती संभाजीनगर शहरात आले आहेत. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मंत्रिमंडळ बैठक आहे. मात्र, मंत्र्यांचा मुक्काम, खान-पान यावरून होत असलेल्या खर्चावर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाड्याला काही देता यावे, यासाठी या मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, बैठकीसाठी आलेल्या मंत्र्यांच्या जेवणाच्या एका थाळीची किंमत 1500 रुपये असणार आहे, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी, अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचे कंत्राट देण्यात आले आहे. एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे. राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. हे सरकार मराठवाड्याला काही देण्यासाठी येत आहे की पर्यटनासाठी? असा सवालही वडेट्टीवारांनी केला. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑगस्टमध्ये सरासरी सव्वाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. संपूर्ण दुष्काळ मराठवाड्याच्या छायेत असताना सरकारच्या मंत्र्यांना अशा फाईव्ह स्टार सुविधांची गरज का पडली?
विजय वडेट्टीवार म्हणाले, कॅबिनेट बैठकीच्या नावाखाली सरकार मौजमस्ती तर करत नाहीये ना? असा प्रश्न यानिमित्ताने पडत आहे. यापूर्वीही मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठका झाल्या आहेत. मात्र, मंत्र्यांची अशी बडदास्त कधीही ठेवली गेली नाही. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळ बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असताना सुभेदारी विश्रामगृहातच थांबले होते. मात्र, आता एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रुम बुक करण्यात आल्या.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम