कोट्यधीश झालेल्या ‘त्या’ फौजदाराचे अखेर निलंबन !
बातमीदार | १९ ऑक्टोबर २०२३
जुगारसदृश ऑनलाइन गेममध्ये जिंकल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे रातोरात कोट्यधीश झाले. दरम्यान, कर्तव्यावर असताना गेम खेळत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली. त्यातच प्रसार माध्यमांना गणवेशात मुलाखत देणे त्यांना भोवले असून अखेर त्या फौजदाराचे निलंबन करण्यात आले आहे.
सोमनाथ झेंडे हे सध्या आरसीपी (दंगा काबू पथक) पथकात कार्यरत होते. १० ऑक्टोबर रोजी उर्से टोलनाका परिसरात बंदोबस्तात असताना त्यांना एका जुगारसदृश ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटीचे बक्षीस लागल्याचे समजले. ही बातमी वेगाने सर्वत्र पसरली. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. मात्र, कर्तव्यावर असताना पोलीस अधिकारी या प्रकारचा ऑनलाइन गेम कसा खेळू शकतो, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करत काहींनी झेंडे यांच्यावर टीका केली.
तर, काहींनी नशीबवान आहे हा अधिकारी, अशा प्रतिक्रिया देत त्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान, ऑनड्युटी असताना ऑनलाइन जुगार खेळला. त्यातून त्यांना काही रक्कम मिळाली. त्याचा गाजावाजा करून त्यांनी ऑनलाइन जुगाराला चालना देण्याचे काम केले आहे. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यांकडे केली होती. दरम्यान, याबाबत पोलीस उपायुक्तांकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. ऑनलाइन गेममध्ये बक्षीस जिंकल्याबाबत गणवेशात मुलाखत दिली. यातून पोलिसांबद्दल चुकीचा संदेश गेला, असा ठपका ठेवण्यात आला असून झेंडे यांना निलंबित करण्यात आले
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम