दोन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेत आमदार पोहचल्या अधिवेशनात !
दै. बातमीदार । १९ डिसेंबर २०२२ । शिंदे व फडणवीस सरकारचे पहिलेच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. त्यात आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्याना मोठा घेराव घातला होता. तर दुसरीकडे पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. “मी आई आहेच, सोबत आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले” अशा भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.
सरोज अहिरे या नाशिकच्या देवळालीच्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्याशी फेब्रुवारी २०२१ ला त्यांचा विवाह झाला. अडीच महिन्यांपूर्वी त्यांनी गोड बाळाला जन्म दिला. प्रशंसक प्रवीण वाघ असं बाळाचे नाव आहे. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने सरोज अहिरे बाळ आणि पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देवळालीच्या आमदार सरोज अहिरे ताईं आज आपल्या अडीच महिन्यांच्या प्रशंसकला घेऊन विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत. अवघ्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन कामकाजात सहभागी होऊन ताईंनी मतदारसंघाप्रति जबाबदारी आणि कर्तव्य परायणतेचे उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केले आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम