महायुती सरकारचा नवा पॅटर्न : शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणे !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकरी अद्याप समाधानी नसून सात महिन्यांत राज्यात दीड हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारला मात्र यातल्या कशाचीच झळ नाही. केवळ खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणे, हाच महायुती सरकारचा पॅटर्न आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

राज्यातील विविध विभागांत झालेल्या शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी सादर करत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. दुष्काळी संकट आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अमरावती विभागात सगळ्यात जास्त ६३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. अमरावती जिल्ह्यात १८३, बुलढाणा १७३, यवतमाळ १४९, अकोला ९४, वाशीम ३८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ५८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८६, बीडमध्ये १५५, उस्मानाबाद १०२, नांदेड ९९, परभणी ५१, जालना ३६, लातूर ३५, हिंगोलीत २० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

नागपूर विभागात १४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यात चंद्रपूर ७३, वर्धा ५०, नागपूर १३, भंडारा ५ आणि गोंदियात ३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. नाशिक विभागात १७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात जळगावमध्ये ९३, अहमदनगरमध्ये ४३, धुळे २८, नाशिक ७, नंदुरबारमध्ये ३ जण आहेत. पुणे विभागात १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सोलापूर १३, सातारा २, सांगलीत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जून महिन्यात झाल्या आहेत. जानेवारीत २२६, फेब्रुवारी १९२, मार्च २२६, एप्रिल २२५ मे २२४ जून २३३ जुलै २२९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम