पोलीस दलाचा पेपर बटण कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोडला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ मे २०२३ ।  राज्यातील अनेक तरुणाचे स्वप्न पोलीस दलात दाखल होण्याचे असते. व अनेक तरूण यासाठी मोठी मेहनत करून यात यशस्वी देखील होत असतात पण काहीना चुकीचा मार्ग लवकर यशस्वी होण्यासाठी वाटत असला तरी ते कधी तरी अडकत असतात. असेच काही तरुण यंदाच्या परीक्षेत अडकले आहे.

BJP add

एका उमेदवारांनी बटण कॅमेऱ्याच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून ते ई-मेलद्वारे बाहेर पाठवले आणि बाहेर असलेल्या शिक्षकांनी त्यांना उत्तरे मायक्रो ब्ल्यूटूथद्वारे सांगितले. शेकडो जणांनी या प्रकारे परीक्षा दिली. एका उमेदवाराकडून १० लाख रुपये घेण्यात आल्याचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर कवठेकर यांनी तब्बल १६ प्रकारचे प्रश्नपत्रिकांचे फोटो मुंबई पोलिसांना पुरावा म्हणून दिले आहेत. भांडूप पोलिसांनी कवठेकर यांचा गुरुवारी जबाब नोंदवला आहे. एसआयटीकडून भरती प्रक्रियेतील या गैरप्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी समितीने केली आहे.

मुंबई पोलिस दलात रिक्त ७ हजार ७८ जागांसाठी ७ मे रोजी लेखी परीक्षा पार पडली. एकूण २१३ केंद्रांवरून ७८,५२२ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. दरम्यान, भरती प्रक्रियेत हायटेक पद्धतीचा वापर करून गैरप्रकार केला जाणार असल्याची कुणकुण स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला लागली होती. समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी ५ मे रोजीच याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत काही जण अशा प्रकारे कॉपी करताना आढळून आले होते. यात कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे, गोरेगाव पोलिस ठाणे, मेघवाडी पोलिस ठाणे आणि भांडूप पेालिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवले.

दरम्यान, बुधवारी मुंबई पोलिस दलातील भरतीसाठीची अंतरिम गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. मात्र, समितीने मुंबईतील डीसीपी पुरुषोत्तम कराड यांचीही भेट घेऊन या प्रकरणी माहिती दिली आहे. अशा प्रकारे परीक्षा पास करून देणारे मोठे रॅकेट सक्रिय असून एका उमेदवाराकडून यासाठी १० लाख रुपये घेण्यात येत होते, असा दावाही समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी एका वाहिनीशी बोलताना केला आहे. या गैरप्रकाराची व्याप्ती मोठी असल्याने आम्ही एसआयटी चौकशीची मागणी केल्याचे ते म्हणाले.

हायटेक पद्धतीने एक हजार उमेदवारांनी अशा प्रकारे गैरप्रकार केल्याचा आमचा दावा आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी. या प्रकरणात पोलिसांनीच चार स्वतंत्र गुन्हे नोंदवल्याने आम्ही केवळ आमच्याकडील पुरावे तपासासाठी पोलिसांना दिले आहेत. माझा जबाबही पोलिसांनी नोंदवला आहे. – राहुल कवठेकर, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती अध्यक्ष

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम