‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाची गर्जना घुमणार ओटीटीवर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ नोव्हेबर २०२२ विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या डॉ.अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपल्या यशाची पताका फडकवली. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक पसंतीची जोरदार पावती मिळवल्यानंतर आता ‘टीएफएस प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाची गर्जना घुमणार आहे. मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि वेब सिरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात. मनोरंजनाच्या या नव्या रुजणार्‍या व्यासपीठावर अधिराज्य गाजवण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.

४ नोव्हेंबरला या चित्रपटाचा वर्ल्ड वाईड ओटीटी प्रिमियर ‘टीएफएस प्ले’ (TFS PLAY) या अॅपवर रंगला . ‘टीएफएस प्ले’ फ्री डाऊनलोड ॲप असून या ॲपवर अवघ्या ९९ रूपयांत आपल्याला हा चित्रपट पाहता येईल.

या प्रदर्शनाबाबत डॉ अमोल कोल्हे सांगतात की, आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. मोठया पडद्यानंतर ओटीटीवर ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक माध्यमाची स्वतःची ताकद आणि ओळख आहे. ओटीटीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचेल हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ‘जगदंब क्रिएशन्स’ची निर्मिती असलेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले असून चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीया, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम