ठाकरे गटाने केला कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा निषेध !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जून २०२३ ।  शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे धडे वगळण्याच्या कर्नाटकच्या काँग्रेस सरकारच्या कृतीचा शिवसेनेच्या ठाकरे गटाने निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरेंना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने ही प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने इयत्ता 6 वी ते 10 वीच्या कन्नड व समाजशास्त्र या विषयांच्या पाठ्यपुस्तकांत बदल करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आदी नेत्यांवरील पाठ्यपुस्तकातील धडे चालू शैक्षणिक वर्षापासून वगळण्यात आलेत. कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी तोफ डागली आहे.

आमदार कायंदे म्हणाल्या – स्वातंत्र्यवीर सावकर आमचे प्रेरणास्थान आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकदा हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. सावरकर हे सर्वांसाठी आदर्श व्यक्तीमत्व आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान व बलिदान खूप मोठे आहे. त्यामुळे त्यांचा धडा पाठ्यपुस्तकातून वगळण्याची कृती अत्यंत निषेधार्ह आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. कर्नाटक सरकारने हेडगेवाराविषयी असा प्रकार केला असेल तर तो ही निषेधार्ह आहे. शाळेतील पुस्तकातून धडा काढून टाकल्यामुळे कोणी लहान होत नाही. पण हे करण्यामागचे कारण काय आहे? नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? कर्नाटक सरकारने घेतलेल्या यासंबंधीच्या निणर्याचा आम्ही निषेधच करतो, असेही मनिषा कायंदे यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम