राज्यात होणार तिसरी आघाडी ; हे नाव चर्चेत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ मार्च २०२३ । गेल्या काही वर्षापासून कोणता पक्ष कुणासोबत युती किवा आघाडी करेल हे कुणीहि सांगू शकत नसले तरी भाजपचे दोन जवळचे मित्र दूर गेले होते पण पुन्हा आता जवळ येणार असल्याची चर्चा राज्यभर होवू लागली आहे. येत्या २०२४ हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे राज्यात एक वर्ष आधीच मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून चार ते पाच पक्ष शड्डू ठोकणार असल्याचं दिसतंय.

मोठे पक्ष लहान पक्षांना गृहित धरून राजकारण करतायत, त्यामुळे आता लहान पक्षांनीसुद्धा प्रस्थापितांना अस्मान दाखवण्याची रणनीती आखल्याचं दिसतंय. भाजप-शिवसेना युती आणि महाविकासआघाडीला पर्याय देण्यासाठी आता तिसऱ्या आघाडीचे पडघम पुन्हा एकदा वाजू लागले आहेत. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष एकत्र येणार आहेत, त्यांच्या आघाडीत तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांच्या भारत राष्ट्र समितीसह अन्यही काही पक्षांचा समावेश होण्याची शक्यता आहे. लवकरच याविषयीची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप आणि महाविकासआघाडीसोबत काही काळ गेली होती. मात्र दोन्हीकडून त्यांचा अपेक्षाभंग झाल्याने राजू शेट्टी यांनी आता वेगळी भूमिका घेतली आहे. तर दुर्लक्ष केल्याने महादेव जानकर यांचा रासपसुद्धा भाजपपासून चार हात दूर आहे. महाविकासआघाडी लक्ष देत नसल्यामुळे शेतकरी कामगार पक्षही नाराज आहे.

मागच्या वर्षी 30 जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, यानंतर राज्यातली राजकीय समिकरणं बदलली आहेत. केंद्रात आणि राज्यात सरकार असल्याने प्रबळ असलेल्या भाजप-शिवसेनेला इतर पक्षांची गरज राहिलेली नाही. तर महाविकासआघाडीमध्ये आधीच तीन पक्ष आहेत. वंचित बहुजन आघाडीची सुद्धा महाविकासआघाडीमध्ये यायची चर्चा आहे, त्यामुळे छोट्या पक्षांनी सत्ताधारी आणि विरोधकांचा नाद सोडत स्वत:चच आव्हान तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून केसी राव महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोकणात अजूनही काही ठिकाणी शेकापचं अस्तित्व आहे. पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे. काही भागात रासपचाही मतदारवर्ग आहे, त्यामुळे हे सर्व पक्ष आणि संघटना एकत्र आले तर तिसरी आघाडी कितपत आव्हान देऊ शकते? हे मात्र पुढच्या वर्षीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम