गद्दारांच्या गाड्या चालवण्याची वेळ आली ; राऊतांचे टीकास्त्र !
दै. बातमीदार । २५ मे २०२३ । ठाकरे व भाजपमध्ये सुरु असलेला वाद कुठल्याही परिस्थितीत कमी न होता वाढत चाललेला आहे. यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊत म्हणाले कि, बाळासाहेब ठाकरेंनी कधीही बेईमान्यांना मांडीवर घेतलं नाही. गद्दारांना लाथा मारुन हाकलून द्या सांगितलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीसांवर गद्दारांच्या गाड्या चालवण्याची वेळ आली आहे असं म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना बोलवलं गेलं पाहिजे असं म्हणत मोदी सरकारवर टीका केली. त्याच पत्रकार परिषदेत राऊत यांनी फडणवीसांनाही टोला लगावला.
२१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. शिवसेनेत सर्वात मोठी फूट त्यावेळी पडली. तसंच उद्धव ठाकरेंनी २९ जून २०२२ ला राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडल्यापासून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या ४० आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जातो आहे. पुन्हा एकदा संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गद्दारांच्या गाड्या चालवण्याची वेळ आली आहे असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आता संजय राऊत यांच्या टीकेला काही उत्तर देतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अनेकदा ते संजय राऊत यांच्या म्हणण्याला उत्तर देणं टाळतात. मात्र आज केलेली टीका अत्यंत बोचरी आहे त्यावर फडणवीस प्रत्युत्तर देणार का? हे पहावं लागणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम