
दै. बातमीदार I ५ डिसेंबर २०२२ I शहरात चोरी व घरफोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या परिसरात रविवारी (दि.4) सहा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून शिरगाव, हिंजवडी, दिघी, महाळूंगे, पिंपरी पोलीस ठाण्यात चोरीचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ कार पार्क करून पहाटेच्या वेळी झोपलेल्या चालकाच्या खिशातून पाच हजार रुपये रोख रक्कम आणि चार हजारांचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 4) पहाटे साडेचार ते साडेपाच या कालावधीत घडली. शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी महेबुब अजमोदिन शेख (वय 26, रा. चिंचोली, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.
बावधन मधील ऑक्सफर्ड हेलिपॅड या हॉलमध्ये चोरीची घटना घडली. मंडप डेकोरेशन करण्यासाठी गेलेल्या दोन कामगारांचे 12 हजारांचे दोन मोबाईल फोन आणि त्याच्या कव्हरमध्ये ठेवलेली 26 हजारांची रोकड असा 38 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. आदिनाथ ज्ञानेश्वर मेंचकर (वय 21, रा. बावधन, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोबाईल फोन चार्जिंगला लाऊन डेकोरेशनचे काम करत असताना चोरट्याने संधी साधून चोरी केली.
व्यंकटराव नागनाथराव मेळगावे (वय 32, रा. बुचडेवस्ती, मारुंजी) यांनी शनिवारी (दि. 3) रात्री लक्ष्मी चौकातील लक्ष्मी फर्निचरच्या दुकानासमोर त्यांची 30 हजारांची दुचाकी पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी सकाळी साडेअकरा वाजता उघडकीस आला. याप्रकरणी मेळगावे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विष्णू गणपत कराड (वय 46, रा. इंद्रायणीनगर, देहूफाटा. मूळ रा. लातूर) यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी (दि. 3) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अज्ञातांनी चोरून नेली. दुचाकी पार्क करून कराड हे कामासाठी गेले असता चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून ही चोरी केली. याप्रकरणी कराड यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम