…तर मतदार संघ १५ वर्ष पुढे गेला असता ; भावा-बहिणीचे राजकारण रंगले !
दै. बातमीदार । २६ मार्च २०२३ । राज्यातील भावा-बहिणीचे राजकारण नेहमीच दिसत असले तरी भावाबहिणीच्या दुखात हे नाते मजबूत टिकून दिसत असले तरी राजकारणाच्या मैदानात मात्र हल्लाबोल सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. सातत्याने दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. आता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेवर निशाणा साधताना मोठं विधान केलं आहे.
परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे जलजीवन मिश्रांतर्गत कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मुंडे म्हणाले, भूमिपूजनाचं श्रेय घ्यायचं असेल तर अवश्य घ्यावं, परंतू, १० वर्ष मंत्री असताना परळी मतदारसंघाचा विकास आपण का केला नाही यांचही श्रेय आपल्याला घ्यावं लागेल. पण जर २००९ मध्ये मला निवडणूक लढवू दिली असती तर मतदारसंघ १५ वर्षांत पुढे गेला असता असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणाही साधला आहे.
सिरसाळा येथील एमआयडीसीवरून पंकजा मुंडे यांना आव्हान दिलं आहे. मुंडे म्हणाले, राज्यासह देशात सत्ता आहे. मग तुम्ही मी आणलेल्या सिरसाळा एमआयडीसीमध्ये एखादा तरी उद्योग आणून दाखवा, मी स्वतः रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत करेल. तसेच काशी विश्वनाथाचं जेवढं महत्त्व आहे तेवढेच महत्त्व परळीच्या प्रभु वैद्यनाथाचे देखील आहे. हे खासदार प्रीतम मुंडेंना माहिती हवं होतं असाही टोला मुंडे यांनी यावेळी लगावला. आमदार धनंजय मुंडे म्हणाले, वंदे भारत ट्रेन बनवण्याचा कारखाना हातातून निसटला. हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प दुसरीकडे गेला ही माझ्यासाठी शरमेची बाब आहे. १० वर्ष तुम्ही मंत्री होता मग या परळी मतदारसंघाचा विकास का केला नाही असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम