अजितदादा व आमच्यात वाद नाही ; छगन भुजबळ !
बातमीदार | ३० सप्टेंबर २०२३
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडून बाहेर आलेले अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये ओबीसीच्या मुद्यावर बोलावण्यात आलेल्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. आता खुद्द भुजबळांनी त्याला दुजोरा दिला आहे. पण त्यांनी हा वाद किंवा संघर्ष नसल्याचे स्पष्ट केले आहे. आमच्यात वाद किंवा संघर्ष झाला नाही. केवळ 2 भावांमध्ये चर्चा होती तशी झाली, असे ते म्हणालेत.
छगन भुजबळ म्हणाले की, मी बैठकीत दिलेली आकडेवारी गायकवाड आयोगाची होती. सरकारमध्ये नोकरीत घेताना आरक्षणाचा अनुशेष बाकी आहे याकडे मी लक्ष वेधले होते. नोकऱ्यांत अनुशेष दिसतोय, हे मी सांगत असताना अजितदादांनी सचिवांना याविषयी विचारणा केली. त्यावर त्यांनी अशी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.
माझ्या बोलण्यानंतर अजितदादा म्हणाले, अशी काही माहिती नाही आणि ती सत्य नाही. त्यामुळे मी उत्स्फूर्तपणे बोललो, की तुमच्याकडे माहिती नाही असे होऊ शकत नाही. त्यावरून थोडीशी बोलचाल झाली. पण नंतर त्याचा पराचा कावळा करण्यात आला, असे छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ म्हणाले की, माझ्यात व अजित पवारांत कोणतेही मतभेद नाहीत. मी माझा मुद्दा काहीसा मोठ्या आवाजात मांडला एवढेच. तो मुद्दा तिथेच संपला आहे. एका घरात दोन भावांची चर्चा होती तशी आमच्यात चर्चा झाली. त्यात खिंडार, अंतर्गत संघर्ष किंवा लढाई असे काही नाही.
भुजबळांनी यावेळी अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला गेले नसल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचेही स्पष्ट केले. अजित पवार त्या दिवशी खूप व्यस्त होते. त्यांच्या कार्यक्रमांना खूप उशीर झाला. मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी 6.30 चे निमंत्रण दिले होते. पण त्यांना उशीर झाल्यामुळे ते गेले नसतील. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची काहीच गरज नाही, असे ते म्हणाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पैसे देवून ओबीसी प्रमाणपत्र देण्यात असल्याचा आरोप केला आहे. भुजबळांनी यावर भाष्य करताना असे करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. पैसे देवून ओबीसीमध्ये नोंदी घेतल्यामुळे पुण्यात काही नगरसेवक निवडून आलेत. त्यांना कोर्टात जावे लागले. चुकीचे प्रमाणपत्र दिले जात असेल, तर ते तातडीने थांबवण्याची गरज आहे, असे भुजबळ म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम