बातमीदार | २७ ऑगस्ट २०२३ | राज्यातील महामार्गावर होत असलेल्या अपघाताची मालिकासह रस्त्यावर पडलेल्या खड्यासाठी मनसे नेहमीच आंदोलन करीत असते त्यासाठी आज पुन्हा एकदा रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेतर्फे रायगडमध्ये आज जागर यात्रा काढण्यात आली आहे. मनसेचे सर्व प्रमुख नेते या यात्रेत सहभागी झाले आहे. आता लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही ही यात्रा शांततेत काढत आहोत. मात्र, यापुढची यात्रा शांततेत नसणार, असा इशारा मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, आमच्यावर काय केसेस करायचे ते करा. जागे व्हा, असेही त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात पळस्पे ते मानगाव अशी 16 किलोमीटरची पदयात्रा मनसेतर्फे काढण्यात आली आहे. पळस्पे फाट्यावरून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे. आठ टप्प्यात मनसे ही पदयात्रा काढत आहे. तर आज या पदयात्रेच्या समारोपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळीते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात तरणखोप ते कासू कोकण जागर पदयात्रा काढण्यात येत आहे. सकाळीच पदयात्रेला सुरूवात झाली. यात्रेत सहभागी झालेले मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, खऱ्या अर्थाने जागर यात्रेला सुरुवात झालेली आहे. मुंबई महामार्ग लवकरात लवकर व्हावा, हीच आमची मागणी आहे. तर, रत्नागिरीतील चिपळूणमध्येही मनसेची पदयात्रा निघणार आहे. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातून ही पदयात्रा सुरु होईल.त्यामुळे महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
यात्रेत सहभागी झालेले अमित ठाकरे म्हणाले, आपण चंद्रावर स्वस्तात पोहोचलो. अवघा 600 कोटींचा खर्च आला. मात्र, जवळपास 15 हजार कोटी खर्च करूनही गेल्या 17 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. हा आवाज आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आम्ही जागर यात्रा काढतोय. आज सगळ्यांना दिसेल की मनसेची ताकद किती आहे आणि कशा पद्धतीने आम्ही यात्रा काढतोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून मनसेचे पदाधिकारी आले आहेत. इथल्या स्थानिक लोकांपर्यंत आम्ही हा मुद्दा पोहोचवणार आहोत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम