कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही !
दै. बातमीदार । ७ जून २०२३ । राज्यात शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापुरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज (बुधवार) रस्त्यावर उतरल्या आहेत. संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्याच्या गृह विभागाकडून कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या शहरात तणाव असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.
कोल्हापूरातील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य़ आवश्यक आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलत आहे. ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वत: अधिकाऱ्यांसोबत बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर पोलीस दल रस्त्यावर आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी स्वत: शिवाजी चौकात रस्त्यावर उतरले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम