राज्यात तीन दिवस पावसाला ; जाणून घ्या कधी होणार पाऊस !
दै. बातमीदार । ३ मार्च २०२३ । राज्यातील वातावरण गेल्या १५ दिवसापासून चांगलेच तापले होते त्यावर आता जनतेला उष्णतेपासून दिलासा मिळणार असल्याची बातमी आली आहे. पहाटे थंडीचा कडाका तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. वातावरणात कमालीचा चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात उद्यापासून ४ ते ६ मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर कोकण आणि विदर्भात सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पारा चाळीशी जवळ पोहोचला होता. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण उन्हाळा सुरु होण्याआधीच पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात सहा मार्च रोजी सर्वत्रच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पाच मार्च रोजी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकण देखील पावसाची शक्यता कायम आहे. मात्र, अतिशय तुरळक पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला आहे. औरंगाबादेत देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील कमाल तापमानात घट होण्याचं चित्र नाही. सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पाऊस अतिशय कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज असल्यानं उकाड्यापासून दिलासा मिळणार नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम