बँकॉकमधील मॉलमध्ये गोळीबाराचा थरार ; तिघांचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ ऑक्टोबर २०२३ | थायलंडची राजधानी बँकॉक स्थित एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये मंगळवारी दुपारी गोळीबाराचा थरार घडला आहे. १४ वर्षीय अल्पवयीन सशस्त्र मुलाने गर्दी असलेल्या मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यात, दुर्दैवाने तिघांना प्राण गमवावा लागला असून इतर ७ जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत.

थायलंडची राजधानी बँकॉकस्थित सियाम पॅरागॉन येथील लोकप्रिय मॉलमध्ये १४ वर्षीय संशयिताने बंदुकीने गोळीबार केला. सर्वप्रथम मॉलच्या बाथरूममधून गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर त्याने सर्वत्र १० हून अधिक वेळा अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे मॉलमध्ये एकच खळबळ माजली व भयभीत झालेले नागरिक सैरावैरा पळत सुटले. बालकांसह नागरिक मॉलच्या दरवाजातून बाहेर पळताना दिसून आले. सुरक्षा रक्षकांनी नागरिकांचे प्राण वाचवण्यात मदत केली, तर काही जण जवळच्या रेस्टॉरंटमधील अंधार असलेल्या खोलीत लपून बसले, अशी माहिती पोलीस प्रवक्ते अर्चायोन कैथोंग यांनी दिली. मॉलमध्ये गोळीबाराचा प्रकार घडला तेव्हा परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. तिथे रस्त्यावर गर्दी जमल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. मॉलबाहेर पोलिसांच्या व्हॅन, रुग्णवाहिका होत्या. या गोळीबारनाट्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात गोळीबार करणाऱ्या अल्पवयिनाला पोलिसांनी सियाम केम्पिस्की हॉटेलमध्ये अटक केली. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी दिले आहेत. दरम्यान, थायलंडमध्ये बंदूक हिंसा सामान्य बाब ठरली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम