उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब काँग्रेसला मतदान करणार, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
दै. बातमीदार | २३ एप्रिल २०२४ | लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला मागच्याच आठवड्यात सुरुवात झाली आहे. १९ एप्रिलला पहिला टप्पा पार पडला तर पुढचा टप्पा २६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. मुंबईसह नाशिक, ठाणे या ठिकाणी २० मे रोजी मतदान होणार आहेत. उद्धव ठाकरे यावेळी शिवसेनेच्या नाही तर काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत. याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब काँग्रेसला मतदान करणार यामागचे गणित काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब उत्तर मध्य मुंबईत राहतात. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या करारानुसार उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला देण्यात आला आहे. काँग्रेसने उमेदवारी कुणाला द्यायची हे जाहीर केलेले नाही. परंतु काँग्रेसलाच ही जागा लढवायची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय हे काँग्रेसला मतदान करतील हे उघड आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हा उद्धव ठाकरेंचा मित्र पक्ष आहे.
१९८९ पासून शिवसेना आणि भाजपाची युती होती. दोन्ही पक्षांनी सर्व निवडणुका एकत्र लढवल्या. त्यामुळे मुंबईतील लोकसभेच्या बहुतांश जागांवर उमेदवार निवडून आणण्यास मदत झाली असून भाजपा आणि शिवसेनेचे भांडण २०१९ मध्ये झाले. त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या वाटा वेगळ्या झाल्या. आता महाराष्ट्रात शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. तर सत्तेत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम